ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
नोंदणी क्रमांक : महा /१०५२/१७/ठाणे. *नोंदणी दिनांक : ८ जून २०१७
पत्ता : डोंबिवली, ठाणे, मुंबई
मराठी भाषेची थोरवी सांगणाऱ्या ज्ञानदेवांचा वारसा जपत मराठी भाषेच्या समृद्धी आणि संवर्धनाच्या उद्देशाने ‘ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या स्थापनेचे उदघाटन कृषिविज्ञान केंद्र, बारामती येथे सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे सरांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलेल्या आणि मराठी भाषेच्या प्रेमापोटी जमलेल्या सदस्यांनी या संस्थेची स्थापना केली. संस्थेचे कामकाज डोंबिवलीतून चालते.
संस्थेचे २५ विश्वस्त आहेत. हे विश्वस्त मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध भाषिक जबाबदाऱ्या, उपक्रम पार पाडण्यासाठी सदैव तत्पर असतात.
विविध उपक्रम, स्पर्धा, परीक्षा, चर्चा-वादविवाद, मराठी गटांना पाठिंबा, व्हॉट्सअप गट, फेसबुक पाने, ट्विटर हँडल असा संस्थेचा मराठीशी जोडलेला गोतावळा मोठा आहे.
आपल्या पूर्वजांनी आपल्याला जन्मभर पुरेल इतकी मराठीतून साहित्य निर्मिती केली आहे आणि ‘भाषा संपेल, मरेल, तिला वाचवा’ अशी भीती बाळगणे हे सर्व मनाचे खेळ आहेत. आपली भाषा सक्षम व्हायला हवी, नव्या जगाच्या आधुनिक पटलावर ती सहज बागडायला हवीच; पण त्याबरोबर भाषेच्या शास्त्रीय, वैज्ञानिक आणि व्यावहारिक बैठकीची माहिती डोळसपणे करून घ्यायला हवी. मराठी भाषा ही आधुनिक विज्ञानाची, आर्थिक व्यवहाराची भाषा बनेल तेव्हाच खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा म्हणून समृद्ध होईल. या दृष्टीने प्रयत्नवादी राहूनच ज्ञानभाषा प्रतिष्ठान कार्य करत आहे.
मराठी भाषा संवर्धनात मराठी शाळांचा फार मोठा वाटा आहे आणि म्हणूनच ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान माझी शाळा माझी भाषा या ब्रीदवाक्याचा स्वीकार करत मराठी शाळांच्या संवर्धनासाठी आणि सक्षमीकरणासाठी कार्य करते. ही संस्था मराठी शाळांच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध असून नियमितपणे मराठी शाळांसाठी नवनवीन उपक्रम, पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न, शाळांसाठी मदत, पालकांशी संवाद अशाप्रकारे विविध माध्यमातून आपली जबाबदारी पार पाडत आहे.
भविष्यात ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान मराठी भाषा आणि मराठी शाळा यांच्यासाठी नक्कीच भरीव कामगिरी करेल यात शंका नाही.
संस्था मुख्यत्वे खालील उद्दिष्टांवर काम करते.
१) प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात मराठी
२) उच्च शिक्षणात मराठी
३) अनुवादित साहित्य निर्मिती
४) युनिकोडिंग
५) वाचनसंस्कृती जोपासणे
६) मराठी संकेतस्थळांचा प्रचार-प्रसार
७) ज्ञानवर्धक साहित्य निर्मिती
८) ब्लॉग्ज निर्मितीला प्रोत्साहन, मदत९) मराठीतून टंकलेखनासाठी मार्गदर्शन आणि मदत
१०) व्यवहारात मराठीचा वापर वाढण्यासाठी प्रयत्न, त्यासाठी सोशल मीडियावरील #मराठीबोलाचळवळ सारख्या चळवळींना प्रोत्साहन, पाठिंबा.
























