पालक मेळावा
मराठी शाळा हा भावनिक मुद्दा नसून त्याला भक्कम शास्त्रीय बैठक आहे अशी संस्थेची भूमिका आहे. मातृभाषेतून शिक्षणामागचे तांत्रिक आणि शास्त्रीय मुद्दे यांबद्दल वेळोवेळी पालकांचे प्रत्यक्ष, तसेच समाज माध्यमातून प्रबोधन व्हायला हवे, यासाठी संस्था प्रयत्नशील असते. पालकांना प्रत्यक्ष भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या भाषामाध्यमाच्या बाबतीत असलेल्या शंका दूर करणे, यांसाठी विविध ठिकाणी पालक मेळावे घेतले जातात. आतापर्यंत पुणे, मुंबई या शहरांत पालक मेळावे घेतले गेले आहेत. येत्या काळात असे पालक मेळावे ठिकठिकाणी घेण्याची योजना आहे.
शाळा सक्षमीकरण
मातृभाषेतून शिक्षण देणाऱ्या मराठी शाळा या मुळात सक्षम आहेतच पण काळानुसार त्या अधिक उपक्रमशील आणि सक्षम व्हाव्या यासाठी विविध उपक्रम संस्थेमार्फत घेतले जातात.
वाचनप्रकल्प
शाळांमध्ये प्राथमिक तसेच माध्यमिक स्तरावर विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी फक्त शाळेच्या सहकार्याने वाचनकौशल्य हा प्रकल्प आखलेला आहे.
मराठी शाळेतील इंग्रजी संवर्धन
मराठी शाळा सक्षमीकरण हे उद्दिष्ट समोर ठेवून मराठी शाळेमधील विद्यार्थ्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व वाढीस लागावे यासाठी इंग्रजी भाषा संवर्धन हा प्रकल्प प्रत्यक्ष कृतिशीलतेच्या आधारे राबविला जाईल.
माझी शाळा
महाराष्ट्रातील दर्जेदार मराठी शाळांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्रकल्प आखलेला आहे. आपल्याला देखील आपल्या शाळेची माहिती वेबसाईट वर द्यायची असल्यास दिलेल्या गुगल फॉर्म मध्ये माहिती भरा.
शिक्षक मुलाखती
महाराष्ट्रातील मराठी शाळांमध्ये शिकविणारे शिक्षक शिक्षणशास्त्राची पदवी घेतलेले त्याचप्रमाणे विविध कलागुण संपन्न असतात आणि उपक्रमशील असतात अशा कर्तृत्ववान शिक्षकांची माहिती जनसामान्यांपर्यत, नवपालकांपर्यत पोहोचविण्याकरिता तसेच या शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी या करीता संस्था कार्यरत आहे.
दिवाळी अंक
‘ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान’ भाषिक मुद्द्यांकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहते. मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी आधी लोकभाषा म्हणून मराठी अधिकाधिक सक्षम व्हावी आणि समाज माध्यमांमध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा, अधिकाधिक नवसाहित्य मराठीतून निर्माण व्हावे, नवनवीन लेखकांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या साहित्याचा प्रसार व्हावा या हेतूने संस्थेने २०१९ मध्ये पहिला विनामूल्य ई दिवाळी अंक प्रसिद्ध केला. यापुढेही दरवर्षी नियमितपणे दिवाळी अंक प्रसिद्ध करण्यासाठी संस्था प्रयत्नशील असेल.
मराठी माध्यमातून शिकलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांची मनोगते
मराठी माध्यमात शिकून आज अनेक उच्चपदावर त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रात मराठी माध्यमातील मुले आपल्या नावाचा ठसा उमटवत आहेत. अशा मुलांची माहिती नवपालकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना त्यांच्या पाल्यासाठी मराठी माध्यम निवडण्याची प्रेरणा मिळावी यासाठी हा प्रकल्प राबविला जातो.
मातृभाषेतून शिक्षण
युनेस्को, ब्रिटिश कौन्सिल, जगभरातले विविध शिक्षणतज्ज्ञ, अशा सर्वांच्या मते पाल्याचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून झाल्यास पाल्याचा अभ्यासाचा पाया मजबूत होतो, विज्ञान-गणिताच्या संकल्पना अधिक चांगल्या स्पष्ट होतात आणि नवीन भाषा शिकणे सोपे जाते. याच सूत्राला अनुसरून संस्थेमार्फत समाज माध्यमे, वर्तमानपत्रातील लेख, प्रत्यक्ष पालक मेळावे, चर्चा यातून मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व सर्वत्र पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
भाषा सक्षमीकरण
आम्ही आमच्या पाल्यासाठी इंग्रजी माध्यम निवडले कारण सगळीकडे इंग्रजीतूनच माहिती वाचायला मिळते, इंग्रजीचा वापर असतो असा अनेक पालकांचा गैरसमज आहे. मात्र, मराठीत देखील गेली १०० वर्षे वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके आणि गेली १० वर्षे समाज माध्यमे, संकेतस्थळे अशा अनेक प्रसिद्धी माध्यमांतून मोठ्या प्रमाणात मराठीतून विविध विषयांवरील माहितीचा प्रचार आणि प्रसार केला गेला आहे. पूर्वी प्रसिद्ध झालेले साहित्य छापील स्वरूपात असल्याने महाजालावर आपल्यासमोर सहज उपलब्ध होत नाही. अशा साहित्याला नवीन रूपात, युनिकोड स्वरूपात लोकांसमोर आणण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. सध्या मराठीतल्या अनेक संकेतस्थळांवर प्रसारित होणारी उपयुक्त माहिती संस्थेच्या फेसबुक आणि व्हाट्सएप गटांमार्फत अधिकाधिक लोकांपर्यंत मूळ स्रोत अधोरेखित करून पाठवली जाते.

