संस्थेच्या कार्याचा आढावा- २०१५ ते २०१९
सोशल मीडियाच्या बदलत्या प्रवाहाचा वापर करून मराठी भाषा आणि मराठी शाळा यांबाबत समाजात जागृती निर्माण करण्याच्या प्रयत्नांतून काही समविचारी सदस्य एकत्र केले आणि ज्ञानभाषा मराठी या समूहाची स्थापना झाली. मराठी भाषेचा मुद्दा हा केवळ सांस्कृतिक व भावनिक नाही तर त्याला वैज्ञानिक बैठक आहे, या जाणिवेतून सतत चार वर्षे ऑनलाईन काम करताना संस्थेची गरज भासू लागली यासाठी ‘ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना जून २०१७ रोजी करण्यात आली. बारामती कृषी केंद्र येथे डॉक्टर वसंत काळपांडे यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन झाले. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानमध्ये विविध क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा असणारे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात स्थित असणारे असे नामवंत विश्वस्त सदस्य आहेत.
◾हेतू आणि उद्दिष्टे◾
➡तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन आणि प्रत्यक्ष कृती यातून नवीन मराठी साहित्य निर्मिती आणि सर्व मराठी शाळांचे संवर्धन करताना शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणे.
➡ विज्ञान, तंत्रज्ञान यांचा वापर करून त्यावर लेखन करणार्यांना प्रोत्साहन देणे. ज्ञानवर्धक माहिती निर्माण करणे.
➡मराठी शाळेतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी उत्कृष्ट असतेस ते अधिक उत्कृष्ट कसे होईल यासाठी उपक्रम राबवणे
➡माध्यम निवडीसाठी शिक्षक व पालक यांचे प्रबोधन करून त्यांच्यातील न्यूनगंड दूर करणे.
➡मराठीत शैक्षणिक साहित्याची निर्मिती करणे. बोलीभाषा संवर्धन, शब्दकोश निर्मिती करणे.
➡ संगणकावर मराठी, इंग्रजी तसेच इतर भाषांचे साहित्य भाषांतरीत करण्याचा प्रभावी प्रयत्न करणे.
➡ मुलांना अवांतर वाचनास प्रवृत्त करणे.
➡ मराठी माध्यमातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा लोकांसमोर आणणे.
➡पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शालेय आणि महाविद्यालयीन सामाजिक स्तरावर विविध क्षेत्रात बँकींग तसेच समाज माध्यमांवर मराठी भाषेचा सर्वांगीण वापर व्हावा यासाठी प्रयत्न करणे.
➡ मराठी ही प्रशासकीय लोकव्यवहार आर्थिक व्यवहारभाषा ज्ञानभाषा व्हावी म्हणून प्रयत्न करणे.
➡ संगणकावर मराठी भाषा संवर्धनासाठी विविध युनिकोड फॉन्ट निर्माण करणे
प्रतिष्ठानने माझी शाळा माझी भाषा” या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रभरातील शिक्षकांचे समूह तयार केले. शिक्षकांना भाषा,विज्ञान तसेच इतर विषयांबद्दल उपयुक्त माहिती पुरविली जाते. शिक्षकांचे अधिकाधिक सक्षमीकरण व्हावे यासाठी विविध विषयांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात येतात. गणित, विज्ञान, भाषा, सामान्य-ज्ञान इत्यादी विषयांचा त्यात समावेश करण्यात येतो. याच समूहातील उपक्रमशील शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या उपक्रमाचा प्रचार केला जातो.
▪मराठी भाषेबद्दल आणि मराठी शाळांबद्दल जनजागृती करताना यावर आधारित शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान तर्फे ppt तयार करून ती हजारो लोकांपर्यंत इमेलद्वारा पोहोचवली गेली आहे. हीच ppt सुचिकांत वनारसे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सादर केली. मातृभाषेतील शिक्षणाला वैज्ञानिक आधार असल्याने हीच ppt डोंबिवली येथील महात्मा गांधी विद्यालयात मृणाल पाटोळे यांची सादर केली.
▪संस्थतर्फे गुढीपाडवा शोभायात्रेत सहभाग घेतला जातो यात आजपर्यंत ‘मराठी भाषेचे पुस्तक,’ ‘मी मराठी शाळा बोलतेय’ या संकल्पना सादर करण्यात आल्या. शिवाय ‘माझी शाळा मराठी शाळा’ हे पथनाट्य सादर करण्यात आले.
▪१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ऍड.शांताराम दातार यांच्या मार्गदर्शनाने मराठी भाषेचा शासन दरबारी वापर व्हावा यासाठी स्वाक्षरी मोहिमेद्वारे हजारो स्वाक्षऱ्या असलेले निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
▪नागपूर विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी वर्षात ‘मराठी भाषेचे संवर्धन’ या विषयावरील व्याख्यानातून नावयुवकांमध्ये मराठी भाषेचा मुद्दा पोहोचविण्यात आला.
▪प्रतिष्ठानच्या समूहातर्फे गेले पाच वर्ष मराठी पंधरवडा साजरा केला जातो या मराठी पंधरवड्यात भाषेचे विविध पैलू लोकांसमोर मांडले जातात. त्यानिमित्ताने ऑनलाइन परीक्षा,स्पर्धा आयोजित केल्या जातात. सर्वांना मराठी भाषेतून व्यक्त व्हावे यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. सोशल मीडियाद्वारे प्रसारित होणाऱ्या या विविध उपक्रमांची दखल शासनातर्फे घेतली जाते.
▪मराठी पंधरवड्यानिमित्त विज्ञानपर लेखनाला प्रोत्साहन म्हणून “निबंधस्पर्धा” घेण्यात आल्या आणि त्याचे प्रमाणपत्र आणि “गोखले स्मृतिचिन्ह” देण्यात आले.
▪”ऑनलाईन एकांकिका स्पर्धा” घेण्यात आल्या. त्यानिमित्ताने स्पर्धकांना पुस्तके आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
▪ट्विटर माध्यमातून “गुगल भाषांतर” करण्यात आले; जे जास्त भाषांतर करतील अशा लोकांना संस्थेतर्फे प्रमाणपत्र देण्यात आले आणि marathi rt, मराठी शब्द यांच्या ट्विटर हँडलतर्फे स्मार्टफोन देण्यात आले.
▪९० वे आणि ९२ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन,डोंबिवली आणि यवतमाळ येथे झाले त्यावेळी मराठी भाषेचा मुद्दा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल या जाणिवेने प्रतिष्ठानने एक दालन घेऊन प्रचार केला; हे असे एकमेव दालन होते की जे कोणत्याही व्यापारी उद्देशाने घेतलेले नव्हते; त्याचा उद्देश फक्त मराठी भाषा प्रचारार्थ होता.
या दालनाची माधुरी पुरंदरे,अच्युत गोडबोले,डॉ.अरुणा ढेरे,डॉ.राणीबंग अशा विविध मान्यवरांनी खास दखल घेऊन भेट दिली आणि कौतुक ही केले.
▪मराठी शाळेतील विद्यार्थी स्वतःच्याच मराठी शाळेची वैशिष्ट्ये स्वतः सांगत असलेले फोटो गेली दोन वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत. याचे श्रेय उन्मेष इनामदार या आमच्या विश्वस्तांना जाते.
▪प्रतिष्ठान तर्फे शिक्षकांचे मार्गदर्शन पर व्याख्यान घेतले जाते. शिक्षकांच्या बैठका घेऊन मातृभाषेतून शिक्षणाचा प्रचार करण्यात येतो.
▪पालकांच्या बैठका घेतल्या जातात आणि पालकांमध्ये मराठी शाळांबद्दल जागृती निर्माण केली जाते.
▪पुणे येथील “जिल्हा परिषद पिसावरे” शाळेमध्ये जाऊन तेथील पालकांचे घराघरात जाऊन प्रबोधन करण्यात आले आणि मुलांना मराठी शाळेकडे वळवण्यात आले.
▪स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी शाळांचे वैशिष्ट्य सांगणारा व्हिडिओ उन्मेष इनामदार या विश्वस्तांनी तयार केला तो लाखो लोकांपर्यंत पोहोचवला गेला.
▪मातृभाषेतून शिक्षण घेताना मराठी शाळेत प्रवेश घेतलेल्या पालकांचे अभिनंदन करावे म्हणून काही पालकांचे मुलांसहित फोटो मागवण्यात आले. मराठी भाषा प्रचारार्थ त्यावर अवतरणे लिहून लाखो लोकांपर्यंत ती पोहोचली. महाराष्ट्राच्या विविध भागातून प्रतिसाद मिळाला.
▪वर्षभरातील काही विशेष दिनाचे औचित्य साधून त्यावर मराठी अवतरणे तयार करून ती पोस्टर रूपाने प्रसिद्ध करण्यात आली आणि मराठीचा प्रचार करण्यात आला. उदाहरणार्थ “मैत्री दिन” “स्वातंत्र्य दिन” या दिवसांमधून मराठी कोट्स लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले.
▪महिलांचा सुद्धा समावेश असावा यासाठी त्यांना लिखाणास प्रवृत्त करण्यासाठी काही लेख मागवले गेले आणि त्याचे ई बुक तयार करण्यात आले नाव होते “महाराष्ट्रात्मजा.”
▪सुचिकांत वनारसे यांनी सद्यस्थितीत येणारे भाषेबद्दल व शाळेबद्दलच्या ज्वलंत प्रश्नांना सडेतोड,समर्पक उत्तरे देणारे लेख लिहिले आहेत.त्याची दखल विविध प्रसारमाध्यमांनी आणि वृत्तपत्रांनी घेतली.
▪अनुवाद म्हणून छोटे छोटे विज्ञानपर माहिती असलेले परिच्छेद घेण्यात आले त्याचे अनुवाद करून #ज्ञानावळ या सदराखाली प्रसारित करण्यात आले.
▪बोली संवर्धन म्हणून चित्रपटांचे सीन देण्यात आले आणि आपापल्या परिसरातील बोलीतून त्याचे संवाद लिहिण्यास प्रेरणा देण्यात आली.
▪प्रतिष्ठानने आपली भाषिक भूमिका शेकडो लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने गडचिरोली ते कोकण असे जिल्हानिहाय गट स्थापन केले.

