संस्थेचे सुरू असलेले काही उपक्रम
१ .#सर्वत्रमराठी या संकल्पनेवर आधारित प्रतिष्ठानचे आजपर्यंत समाजातील विविध क्षेत्र विचारात घेऊन स्थापत्यशास्त्र, पाकशास्त्र, वैद्यकशास्त्र,निसर्ग संवर्धन, तंत्रज्ञान असे १०० च्या आसपास समूह आहेत.या समूहातून ज्ञानवर्धक चर्चा घडविल्या जातात. विविध स्तरावरून येणारे प्रश्न या गटात विचारले जातात; त्याच्यावर सखोल चर्चा करून “ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान च्या ब्लॉग” वर ती माहिती संकलित करून प्रसारित केली जाते.
कारागिरी आणि मैफल यासारख्या गटांतून सदस्यांना लिहिण्यास प्रवृत्त करून त्यांचे संकलन ब्लॉगवर होत आहे. पाककृती सारख्या गटातून महिलांना पाकशास्त्राविषयी लिहिण्यास प्रवृत्त केले जात आहे आणि प्रतिष्ठानच्या ब्लॉगवर संकलित केली जात आहे.
सातबारा व स्थापत्य आणि वैद्यकीय या गटांतर्फे लोकांनी विचारलेल्या शेकडो प्रश्नांची उत्तरे देऊन अधिकाधिक तांत्रिक तसेच वैद्यकीय माहिती उपलब्ध होत असून ती ब्लॉगवर हजारो लोकांच्या आसपास पोहोचत आहे.
२. “रविवार ऑनलाइन वाचनकट्टा” हा गेले ३ वर्षे प्रतिष्ठानतर्फे राबवला जाणारा अतिशय अभिनव उपक्रम!! हल्लीच्या पिढीचे आता स्टायलिश वाचन झाले आहे याचा वापर करून ऑनलाइन वाचनकट्ट्याचे साधारण पाच पैलू तयार करण्यात आले आहेत:-
➡भोलानाथ कट्टा:- लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी. पालकांकडून मुलांची वाचने घेऊन ते ऑडिओ रूपात प्रसारित केले जातात.
➡सावरकर किंवा अत्रे कट्टा:- मोठ्या वयोगटातील व्यक्तीसाठी हा कट्टा आहे.
➡चावडी वाचनकट्टा:- हा शिक्षक व शालेय विद्यार्थी यांच्यासाठी आहे.
➡पुस्तक वाचनकट्टा:- विविध लेखकांशी संपर्क साधून त्यांचे वाचनीय, ज्ञानवर्धक साहित्य त्यांच्याच परवानगीने वाचन केले जाते आहे.सध्या “पर्व प्रगतीचे परिवर्तनाचे” हे पुस्तक वाचून पूर्ण करण्यात आले आहे. पुढे “धनंजय किर” यांच्या पुस्तकांची परवानगी मिळालेली आहे.
➡चांदोबा वाचनकट्टा:- १९६० पासून चे चांदोबा आम्ही लोकांपर्यंत वाचनाच्या आधारे पोहोचवत आहोत.
➡याच धर्तीवर प्रत्यक्ष वाचनकट्ट्यालाही सुरुवात करण्यात आली. विंदा करंदीकर जन्मशताब्दी निमित्त विंदा वंदन या कट्टयाचे आंतरभारतीय विद्यालय, इचलकरंजी या शाळेत प्रथम सादर करण्यात आला. हाच कट्टा इचलकरंजी येथील आकाशवाणीवर ही प्रसारित करण्यात आला.
विंदा वंदन, हास्य कट्टा, दिवाळी अंक वाचन असे प्रत्यक्ष वाचनकट्टे पुणे आणि डोंबिवली,इचलकरंजी येथेही राबविण्यात आले. भविष्यात असे कट्टे राबवून वाचनसंस्कृती जोपासण्याचा अधिकाधिक प्रयत्न करण्यात येईल.
३. पुढे जो अभिनव उपक्रम आहे तो “चला अनुवाद करूया” या उपक्रमाद्वारे आम्ही इंग्रजीतील आणि बोलीभाषेतील तसेच इतर भाषेतील ज्ञानवर्धक माहिती अनुवाद रूपाने लोकांसमोर आणत आहोत.
४. “युनिकोडींग करणे” यात एकूण २०१२ पूर्वीचे लेखांची कात्रणे लोकांना आवाहन करून जुने वृत्तपत्र मागवली जात आहेत.त्याचे युनिकोडिंग करून ब्लॉगवर संकलित केले जात आहे.
५. प्रतिष्ठानचे जिल्हानिहाय कृती गटसुद्धा स्थापन करण्यात आले आहेत. पुणे, डोंबिवली,नाशिक या गटांची स्थापना करून त्यामार्फत शाळांमध्ये जागृती करण्यात येत आहे.
६. “स्काय साय क्यू” या संस्थेतर्फे गेल्या वर्षी “जलसंवर्धन” या विषयावर आधारित पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. यात पाच लाखाचे,तीन लाखाचे व दोन लाखाचे असे बक्षीस घोषित करण्यात आले होते. ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानने या संस्थेला पाठिंबा दिला. या स्पर्धेत ही तिन्ही बक्षिसे मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेली आहेत.
७. #मराठीकोट्स या ऑनलाईन उपक्रमाद्वारे वर्षभरातील खास दिवसांचे औचित्य साधून त्यावर मराठीतून कोट्स बनवले जाता आहेत आणि त्याचा प्रचार पोस्टर्स द्वारे केला जात आहे.
८. पालकांमध्ये मातृभाषेतील शिक्षणाबद्दल जागृती व्हावी म्हणून पुणे येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सह पालक मेळावा आयोजित करण्यात आला. यात मराठी भाषेतून यशस्वी झालेल्या होतकरू तरुणांची ppt सादर करण्यात आली.
९.’मराठी भाषेचे विविध आयाम’ या विषयाला अनुसरून संस्थतर्फे इ-दिवाळी अंक तयार करण्यात आला.
मराठी भाषा आणि मराठी शाळा याप्रती बांधिलकी जपत ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान भविष्यात नक्कीच भरीव कार्य करेल!!

